एमआयडीसीच्या वतीने विक्रमी वेळात बांधून पूर्ण करण्यात आलेल्या कोरोना रुग्णालयासाठी कर्मचार्यांच्या भरतीसाठी आज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रचंड गर्दी होती. या गर्दीत फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला दिसत असल्यामुळे कोरोनाच्या दृष्टीने ही गर्दी पॉझिटिव्ह ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेतर्फे कोविड-19 रुग्णालयासाठी 140 जणांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. यातील काही पदांसाठी मंगळवारी (दि.16 रोजी) मुलाखती ठेवण्यात आल्याने सकाळपासूनच शेकडो उमेदवारांनी महापालिका मुख्यालयात गर्दी केली होती. कोव्हिड रुग्णालयाकरिता केल्या जाणार्या भरती मध्येच भरमसाठ गर्दी पाहायला मिळाली.’ सोशल डिस्टन्सिंग ’ पाळा असे सांगणार्या मनपानेच नियमांचा फज्जा उडवल्याचे पाहायला चित्र दिसून आले.
चिकलठाणा एमआयडीसी परिसरात राज्य शासनाने 250 खाटांचे कोविड-19 हॉस्पिटल उभारले आहे. शुक्रवारी (दि. 12) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर हॉस्पिटल महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग असेपर्यंत हे रुग्णालय महापालिकेमार्फत चालविले जाणार असून, प्रशासनाने 140 जणांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 13 एमडी डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, टेक्निशियन अशा पदांची भरती केली जाणार आहे. यातील काही पदांसाठी मंगळवारी मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. म्हणून शहरासह इतर जिल्ह्यातील बेरोजगार तरूण-तरुणींनी मनपा मुख्यालयात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. महापालिका मुख्यालयासमोर उमेदवारांच्या रांगाच लागल्या होत्या. दरम्यान महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता कोविड रुग्णालयासाठी लागणारा खर्च जिल्हा नियोजन समितीतर्फे किमान एक वर्ष तरी मिळावा, अशी विनंती शासनाकडे करण्यात आली असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
7 कोटीचे रुग्णालय
एमआयडीसीचे हे रुग्णालय 7 कोटींमध्ये तयार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे काम सत्तारुढ पक्षाच्या एका स्थानिक नेत्याच्या भावाला मिळाले असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे संपूर्ण रुग्णालयाचे स्ट्रक्चर तयार होते. ठेेकेदाराने 7 कोटींचे बेड व अन्य अत्यावश्यक साहित्य तयार बिल्डिंगमध्ये व्यवस्थितपणे रचून दिल्याचे या सूत्रांचे म्हणणे आहे.













